March 12, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

काडादी यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे काम करा : दिलीपराव माने

काडादी यांच्या विजयासाठी प्रामाणिकपणे काम करा : दिलीपराव माने
मंद्रूप, – सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास गेल्या दहा वर्षांत खुंटला आहे. या मतदारसंघाला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी अपक्ष उमेदवार व सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज काडादी यांच्या विजयासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून  त्यांना मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन माजी आमदार दिलीपराव माने यांनी केले आहे.
शुक्रवारी, हत्तूर या गावांचा  दौरा करून पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधताना  ते बोलत होते. याप्रसंगी स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, सिकंदरताज पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार, महादेव पाटील, अशोक देवकते, सिद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक शिवानंद पाटील – कुडल, सूर्यकांत पाटील, राजशेखर भरले, रावसाहेब व्हनमाने, सोमनिंग कनपवडियार, बिळेणी पट्टेवडियार, नागप्पा गुंडू, अब्दुल ग.शेख, अमजद नदाफ, रावसाहेब व्हनमाने, शुकर सगरे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी माने म्हणाले,  धर्मराज काडादी यांना मानणारा हत्तूर हे गाव आहे. या मतदारसंघातून ते निवडणूक लढवत असल्याने सर्वांनी एक दिलाने, एक मनाने व प्रामाणिकपणाने काम करून काडादी यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करावेत. आम्ही सर्वजण काडादी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आमच्या सर्वांच्या मान्यतेनेच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत आहोत हा एकीचा संदेश मतदारसंघात जावा, यासाठीच आम्ही गावभेट करीत आहोत. ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपापसातील गैरसमज दूर करून काडादी यांच्या विजयासाठी ग्राम स्तरावर आणि तालुकास्तरावर तसेच शहरात राहणाऱ्यांनी मताधिक्य मिळवून देण्यासाठी नियोजन करावेत असे त्यांनी आवाहन केले.
२० नोव्हेंबरला काडादी यांना सर्वाधिक मतदान होण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी  नियोजन करावे. सर्वांनी प्रामाणिकपणे काम करून जास्तीत जास्त मतदान काडादी यांना कसे होईल, यासाठी कामाला लागावे. समाजातील सर्व घटकातील मतदारांपर्यंत पोहोचावेत, मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान केंद्रांपर्यंत आणावेत, धर्मराज काडादी यांचे ‘कॉम्प्युटर’चे निवडणूक चिन्ह‌ सर्वांना माहित आहेच. त्यामुळे कॉम्प्युटरचे बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले.