DHARASHIV

उमरगेकरांनो सावधान ! डेंगूचा प्रदुर्भाव वाढला दोन रुग्णांचा मृत्यू; साथीच्या आजारांचाही फैलाव

उमरगा :

उमरगा शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाने जोर पकडला आहे. वाढलेल्या पावसामुळे शहरात डेंगी, मलेरियाच्या संशयित रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मागील चार दिवसांमध्ये डेंग्यू सदृश तापाने दोन वेगवेगळ्या मुलांचा सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत नगरपालिका आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

 डेंग्यूसदृश्‍य रुग्णांमध्ये प्लेटलेट कमी होत आहेत. यामुळे ब्लडबॅंकमध्येही प्लेटलेट्‌सची मागणी वाढली आहे. डेंग्यू या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या एडिस इजिप्ती डासाच्या वाढीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. त्यामुळे रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पालिकेकडून आवश्‍यक त्या उपाययोजना होण्याची गरज आहे.  दरम्यान  मदनानंद कॉलनी परिसरातील ओम शिवाजी साळूंके (वय.१९) याला पाच दिवसांपूर्वी डोकेदुखी अंगदुखी व थंडी तापाचा त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर केलेल्या चाचणीत रक्ताचा अहवाल डेंग्यू पॉझिटिव्ह आला. त्यानंतर सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर उपचारा दरम्यान गुरुवारी ओम याचा मृत्यू झाला.
  पतंगे रोड परिसरातील सत्यजीत हणमंत देशमुख (वय. १२) यालाही डेंग्यू सदृश्य लक्षणे दिसताच त्याला शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सत्यजित यालाही सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान शनिवारी, (दि ३१ )सत्यजीत याचा मृत्यू झाला. शहरात चार दिवसांत दोन मुलांचा डेंग्यू सदृश तापामुळे मृत्यु झाल्याने खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहे. नगरपालिकेकडून कोणत्याही प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे .
सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढले
एका बाजूला शहरात डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे सर्दी, खोकला व तापाचे रुग्णही वाढत आहेत. बदललेल्या हवामानामुळे विषाणूजन्य आजार पसरत आहेत. त्यामुळे शहरातील खासगी व सरकारी दवाखान्यांमध्ये सर्दी व तापाच्या रुग्णांची गर्दी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button