March 6, 2026

ShivNirnay

हिंदवी बाण्याचे मराठी दैनिक

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना घेट डी.बी.टी मार्फत अनुदानाचे वाटप करणे-

सोलापूर दि.10 -शासनाचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ योजनेतील लाभार्थ्यांना दरमहा १५००/- रुपये अनुदान दिले जाते. सदरचे अनुदान तहसिल स्तरावरुन बँकेत पाठवून NEFT/RTGS व्दारे लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केली जाते. मात्र, आता थेट डीबीटीमार्फत पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावर अनुदान वितरीत केले जाणार आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेच्या लाभासाठी यापूर्वी तहसिलकडून संबंधित बँकेत सर्व लाभाथ्यांची यादी पाठवून त्यानुसार निधी दिला जात आहे. तो निधी बँकेकडून संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात वर्ग केला जात आहे.

परंतु आता संगायो व श्रावणबाळ लाभार्थ्यांचे अनुदान बँकेच्या खात्यावर थेट डीबीटीमार्फत मिळणार आहे. त्यासाठी संगायो निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा लाभ घेत असलेल्या पात्र लाभार्थ्यांकडून आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांक संकलित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आपला मोबाईल नंबर आधाराशी संलग्न असणे आवश्यक आहे. संगायो व श्रावणबाळ योजनतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड, मोबाईल नंबर इ. आवश्यक कागदपत्रे संबंधित तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेमधून सदर योजनेचा लाभ घेत आहात त्यांचेकडे ३१ जानेवारी २०२५ अखेर पर्यंत जमा करावेत. जे लाभार्थी आवश्यक कागदपत्रे जमा करणार नाहीत ते लाभार्थी अनुदानापासून वंचित राहतील याची नोंद घ्यावी.

विशेष सहाय्य योजनेचे लाभार्थी हे अनुदानापासून वंचित राहू नये यासाठी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे तहसिल कार्यालयाच्या संजय गांधी शाखेत अथवा संबंधित गावचे तलाठी अथवा ज्या बँकेमधून सदर योजनेचा लाभ घेत आहात तेथे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासन यांचेकडून करण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे :-

 हयात प्रमाणपत्र, आधार कार्ड, छायांकित प्रत, बँक पासबुक चे छायांकित प्रत, मोबाईल नंबर आधार कार्ड जो बँकेच्या खात्याला लिंक केला असेल तो , शिधापत्रिका छायांकित प्रत, दिव्यांग प्रमाणपत्र छायांकित प्रत. इ.